पुणे : देशभरात तापमानाचा नीचांक नोंदवला जातोय. उत्तर भारतात शीतलहरींमुळे प्रचंड गारठा वाढला असून हरियाणातील हिस्सारमध्ये काल २.५ओल तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील शीत लहरींचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. उत्तरेकडील वारे हळूहळू दक्षिणेकडे येत असल्याने महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. पण येत्या २४ तासात देशभरात हवामान बदलणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. सध्या उत्तरेत बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिमी झंजावातामुळे हवामानात मोठा बदल होणार आहे. उत्तरेत अनेक भागात धुक्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर भारतातील काही भागात धुक्यामुळे, निवडक विमानतळांवरील विमान वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येतंय. यामुळे प्रवाशांना विलंब होऊ शकतो. प्रवाशांना अधिकृत विमान सेवांची माहिती अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
सध्या उत्तर भारतात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक राज्यांमध्ये धुक्याची चादर कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेली पावसाची शक्यता ही उत्तरेतील राज्यांमध्ये काही तुरळक भागांमध्ये वर्तवण्यात आल्याने त्या भागात दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ होणार आहे. गारठा कायम राहणार असून पंजाब हरियाणा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील ४ दिवसात किमान तापमान १ ते २ अंशांनी घटणार आहे. सध्या पश्चिमी झंजावात उत्तरेकडे तयार होत असून त्यामुळे हा हवामान बदल होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कसे?
राज्यात पुढील पाच दिवस हवामानात दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश भागात १० अंशांच्या खाली तापमान गेले आहे. अहिल्यानगर ७.७, छत्रपती संभाजी नगर १०.५, मालेगाव १०, नाशिक ९.८, परभणी ९.९, सातारा १०.८, पुण्यात ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी पारा घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढली असून काही भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी व रात्री प्रचंड गारठा जाणवतोय.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील पाच दिवस किमान तापमान १ ते २ अंशांनी घसरणार आहे. पुढील २४ तासानंतर हळूहळू २ ते ३ अंशांनी तापमानात वाढ होईल असे सांगण्यात आले आहे. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडे व थंड हवामान राहण्याची शक्यता आहे.